Ad will apear here
Next
माझं घर
‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत, लहानपणापासून आजतागायत त्यांचं ज्या-ज्या ठिकाणी वास्तव्य झालं, त्या घरांबद्दल...
..........
एका ज्योतिषानं लहानपणी सांगितलं होतं की, ‘मोठ्या जागांमध्ये राहण्याचे तुझे योग आहेत.’ माझ्या जन्मापासून चार वर्षांपर्यंत आमचं कुटुंब कसब्यातल्या मोघे वाड्यात राहत होतं. पुढे १९५० साली आम्ही पुण्यातल्या पेरूगेटजवळ ढमढेरे वाड्यात राहायला गेलो. एक हजार चौरस फूट जागा होती. शाळा-कॉलेजचं शिक्षण, तसंच लग्नही त्याच ठिकाणी असताना झालं.

तिथे २८ वर्षं वास्तव्य झाल्यावर मी व सौ. आशा येरवड्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये राहू लागलो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लष्करानं तिथे खूप बरॅक्स आणि तीन मोठे बंगले बांधले होते. एकूण परिसर १२५ एकरांचा. तिथल्या तिथे जागा बदलण्याची संधी होती. आम्ही त्या वसाहतीमध्ये एकूण पाच जागांमध्ये राहिलो. शेवटी तर ‘कमिशनर’सारख्या एका प्रचंड बंगल्यात राहण्याचं भाग्य मिळालं. त्या जागेत कॉलेजचे ब्रिटिश प्राचार्य व नामांकित प्राध्यापक राहिलेले होते.



आमच्याकडे दोन हजार चौरस फूट जागा असेल. जाडजूड दगडी भिंती, सुमारे २० फूट उंचीवर कौलारू भक्कम छत आणि त्याखाली सहा खोल्या. उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार. आमच्या दोन मुलींचं बालपण तिथेच गेलं. भोवताली वड, पिंपळ, आंबा, फणस इत्यादी वृक्ष. डास असायचे, त्यामुळे मच्छरदाणी कायम लावलेली असायची. अधूनमधून आजूबाजूला साप निघायचे. हे सर्व वातावरण म्हणजे जणू कोकणातच राहत होतो. सुदैवानं ढेकूण आणि विंचू नव्हते.

आवराआवर, नीटनेटकेपणा आमच्यापैकी एकाच्याही रक्तात नाही. पुस्तकं, कपडे, फर्निचर, पेपरची रद्दी या गोष्टी विपुल. परंतु जागाच एवढी मोठी होती, की त्या कुठल्या कुठे एका बाजूला सामावून जायच्या. लोकांची ये-जा तशीच भरपूर. प्यून, वॉचमनापासून ते डायरेक्टरपर्यंत आणि देशोदेशीचे विद्यार्थी आमच्याकडे प्रेमानं येत. ‘दार घराचे सदैव उघडे!’ त्यांचं चहा-पाणी, जेवणावळी सतत चालूच.

एकदा नातलगांचं संमेलन तिथं भरवलं, तेव्हा नाईलाजानं घर आवरलं होतं. तेसुद्धा बहिणीनं दोन नोकर आणून भाग पाडलं म्हणून. चार पोती कचरा त्या वेळी फेकून दिला होता. तरीही त्यात काही महत्त्वाच्या गोष्टी तर गेल्या नाहीत ना, याची काही दिवस आम्हाला चिंता लागून राहिली होती. हा ‘वनवास’ चौदा वर्षं घडला. खूपच आनंदाचा काळ!

तिथल्या घरात तीन-चार वर्षं आम्ही आठ-दहा लोक नियमित कॅरम खेळायचो. कॅम्पसवर राहणारे सहकारी पाळीपाळीनं एकेकाच्या घरी जेवायलाही जात असू. आम्ही तिथे एका मोठ्या कुटुंबासारखे राहत होतो. पुढे पुढे लोक बाहेर स्वत:च्या जागा घेऊ लागले आणि अनेक दिशांना पांगले.



रोज पूजा-अर्चा न चुकता. त्यानंतर गीता व दासबोध वाचन. रेडिओवरच्या सनईपासून सकाळ सुरू. रात्री विविध भारतीची गाणी संपेपर्यंत रेडिओ चालू. दूरदर्शन घरात आल्यानंतर त्यावरचे चांगले कार्यक्रम बघणं. अजूनही तोच क्रम चालू आहे. हजारो चित्रपट घरातच पाहिले. हिंदी-मराठी संगीत अखंड चालू असतं. याच्या जोडीला भरपूर वाचन. घरात कथा-कादंबऱ्यांबरोबरच, संस्कृत, पुरातत्त्व, ज्योतिष, प्रवास, धार्मिक आदी विषयांवरील हजारो पुस्तकं आहेत. इतरांनाही आवर्जून वाचायला देतो. हीच खरी आमची संपत्ती आहे.

घरी जेवायला लोक येणार म्हणजे बायकोसह सर्व जण खुशीत असतात. किमान दहा पाहुणे तरी असावेत, ही अपेक्षा. तीन प्रकारचे भात, पाच पक्वान्नं आणि डाव्या-उजव्या बाजूचे पदार्थ बहुतेक वेळा होणारच. लोकांची खाण्याची क्षमता आजकाल खूप कमी झालेली आहे. त्यामुळे भरपूर पदार्थ शिल्लक उरतात. पुढे दोन दिवस (चहाखेरीज) गॅस पेटवावा लागत नाही.

माझं जेवण फार सावकाश चालतं. एक घास ३२ वेळा चावावा असं म्हणतात; पण मला तो ४०-५० वेळा चावावा लागतो. त्यामुळे घरात जेवताना रेडिओवरचं नादब्रह्म किंवा दूरदर्शनवरील शब्दब्रह्म यांचा स्वस्थपणे आनंद घेता येतो. लग्नाच्या पंगतीत हल्ली जेवण्याला अर्थच उरलेला नाही.

१९९२मध्ये आम्ही आळंदी रोडलगत, विश्रांतवाडीच्या अलीकडे प्रतीकनगर भागात स्थलांतर केलं. चार खोल्यांचा फ्लॅट. डेक्कन कॉलेजमधलं सगळं सामान नव्या जागी मावणंच शक्य नव्हतं. खूप वस्तूंची विल्हेवाट लावावी लागली.

आमच्या सोसायटीत सुमारे ६०० फ्लॅट्स आहेत; पण मला लेखक म्हणून ओळखणारी सात-आठ घरंच असतील. एक प्रकारे ते बरंच आहे. गप्पांत वेळ घालवणं आपल्याला आवडतं. ‘मी कामात आहे, नंतर भेटू,’ असं सांगण्याची इच्छा आणि सामर्थ्य माझ्यात नाही. मुलींच्या मित्र-मैत्रिणींशीही आमची मैत्री! त्यांचं नियमित जाणं-येणं असतं. 

लेखन हा माझा व्यवसाय. बाकी सगळं सांभाळून सवड मिळेल तसं लिहायचं. बाजूला रेडिओ, सीडी चालूच असते. लेखक, प्रकाशक, मित्र घरी येतात. बाहेरही आम्ही भेटतो. हास्यविनोद भरपूर होतो. सतत खूप हसूनही लठ्ठ मात्र झालो नाही.

रेडिओवर सकाळी सात दहाच्या आणि दूरदर्शनवरील सायंकाळी सातच्या बातम्या चुकवायच्या नाहीत; आणि एक मराठी व एक इंग्रजी पेपर किमान वाचायचा, हा नियम. जगात काय चाललंय, हे त्यामुळे समजत राहतं. घरात इंटरनेट असल्यामुळे विश्वसंचार करता येतो. देश-परदेशातील मित्र, लेखक व प्रकाशकांशी संपर्क साधता येतो.

कुठल्याही लेखकाचं प्रातिनिधिक घर थोड्या-फार फरकानं असंच असतं- असणार. सुबत्तेनुसार सुखसोयींची साधनं कमी-अधिक एवढंच.

मध्यमवर्गीय मराठी माणसाचं एकच मोठं स्वप्न असतं. लहानसं का असेना, स्वत:च्या मालकीचं घर असावं. त्यासाठी तो धडपडतो आणि एकदा का ते घेतलं, की वर्षानुवर्षं त्याचे हप्ते भरत बसतो. पूर्वी घरासाठी कर्ज मिळणं अवघड असायचं. एलआयसी आणि एचडीएफसी या दोनच मुख्य कंपन्या कर्ज देत. मध्यमवर्गीयांना शक्यतो कर्ज मिळू नये, असे त्या वेळी नियम होते. आता परिस्थिती वेगळी आहे. कंपन्या उदंड झाल्या. घरी येऊन लाखो रुपये द्यायला त्या तयार असतात. दुसऱ्या बँकेचं/ कंपनीचं कर्ज ट्रान्स्फर करून घ्यायला तत्पर असतात. हल्ली पगार भरपूर असल्यामुळे ‘कोटीच्या कोटी’ उड्डाणे करायला लोकांना काहीच वाटत नाही. जागा विकत घेऊन भाड्याने देण्याचे प्रमाण मोठे आहे. गुंतवणुकीवर मिळणारे उत्पन्न (व्याजाचा विचार केल्यास) कमी असते. तरीही लोक निवृत्तीच्या वेळचा विचार करून घरं घेतातच. म्हणून असं म्हणतात, की ‘वेडे लोक घर विकत घेतात आणि शहाणे लोक त्यात भाड्याने राहतात.’

मी लहान असताना आमची परिस्थिती बेताची होती. घराचं भाडं भरायला उशीर व्हायचा. मालक कटकट करायचे. मला ते दिवस स्पष्ट आठवतात. पुढे १९८८ साली आई-वडिलांचं सहा खोल्यांचं मोठं घर झालं. आम्ही तेव्हा डेक्कन कॉलेजवर राहत होतो. त्याला अर्थातच भाडं पडत होतं. स्वत:ची जागा घेण्याचा विचार झालेला नव्हता. आम्हा दोघांचं उत्पन्न लक्षात घेता ते अवघडच होतं. नोकरीतून निवृत्त झाल्यावर कॉलेजची जागा सोडणं आवश्यक असतं. त्या संदर्भात एकदा कौटुंबिक चर्चा/वादविवाद चालू असताना ‘त्यांनी मग खेड्यात जाऊन राहावं’, असा अनाहूत सल्ला मिळाला. गंमत म्हणजे, १९९२ साली अचानक जागा घेण्याचा निर्णय होऊन, एक महिन्याच्या आत कर्ज वगैरे मिळून, दोन बेडरूमचा फ्लॅट ताब्यात आला आणि तिथे लगेच राहायलाही गेलो. सहा-सात वर्षांत त्याचं कर्जही फिटलं. तिथेही येऊन आता २७ वर्षं झाली. आणखी विशेष म्हणजे महाराष्ट्रात माझे ‘फॅन’ असलेल्या वाचकांची संख्या इतकी मोठी आहे, की गावोगाव स्वागत होणारी हजारो ‘माझी घरं’ निर्माण झाली.

कुठल्याही काळात घर घेणं, म्हणजे त्यासाठी पैसे उभारणं अवघडच असतं. उदाहरणार्थ, १९७५ साली, आमचं लग्न झालं, तेव्हा ‘ओनरशिप’चा दर १२५ रुपये होता. याचा अर्थ ६०० चौरस फूट जागा घेण्यासाठी ७५ हजार रुपये. त्या वेळी आमचं एकूण उत्पन्न एक हजार रुपयेसुद्धा नव्हतं. मग कशी जागा घेणार? त्याआधी काही काळ मॉडेल कॉलनीसारख्या ठिकाणी ७५ रुपये चौरस फूट दराने जागा मिळत होत्या. आळंदी रस्त्याला जागा घेतली, तेव्हा तोच दर ४०० रुपये झाला होता. आज तो सहा-सात हजारपर्यंत जाऊन पोहोचला आहे. थोडक्यात, दृढनिश्चय करूनच घर घ्यावं लागतं - कर्ज यथावकाश फिटतं. 

आमच्या दोन मुली. मी त्यांना नेहमी गमतीनं म्हणायचो, ‘एक जण लंडनला जाऊन राहा, दुसरीनं पॅरिसला वास्तव्य करावं. म्हणजे आम्ही दोघं एकेका मुलीकडे आलटून पालटून राहू.’ ते काही झालं नाही; पण एक दिल्लीला आणि दुसरी दुबईला गेली. त्यांची स्वत:ची घरंही एकापेक्षा अनेक झाली. वास्तुयोग असा असतो. पुण्यातच म्हटलं, तरी सकाळचा नाश्ता एका घरात, दुपारचं जेवण एका घरात आणि रात्री तिसऱ्या घरात जेवण करायचं म्हटलं तरी शक्य आहे. ही सगळी ‘आमची’च घरं!

आता एक नवीन घर खुणावत आहे, असं वाटतं. घर बदलणं, हासुद्धा योग असावा लागतो. भविष्य माना किंवा न माना - प्रत्यक्ष अनुभव तर येतोच ना!

- रवींद्र गुर्जर
ई-मेल : rvgurjar@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZKXCB
Similar Posts
पुण्यातील जुनी चित्रपटगृहे नुसत्या आठवणींनी गतकाळात नेणाऱ्या पुण्यातील जुन्या चित्रपटगृहांबद्दल लिहीत आहेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरात...
माझे ‘नाट्य-चित्र’मय जग ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत नाटक आणि चित्रपट क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामाबद्दलच्या आठवणी...
यशस्वी चित्रपटांचे निकष ‘पटकथा लेखनाचा अभ्यास करताना मी गेल्या ८० वर्षांतल्या गाजलेल्या आणि मी पाहिलेल्या सुमारे १०० चित्रपटांची यादी केली. प्रत्येक चित्रपट कोणत्या ‘गुणां’मुळे गाजला, त्याचा विचार केला. त्यावरून ‘यशाचं नेमकं गमक काय?’ हे शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही गणिती सूत्रानं यशस्वी चित्रपटाची निर्मिती करता येत नाही,
खूप काही शिकवून गेलेला बिहार दौरा... १९६७मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक जण मदतकार्यासाठी तिकडे गेले होते. त्या वेळचे काही अनुभव गुर्जर यांनी ‘किमया’ सदरात गेल्या भागात सांगितले. त्यांचे आणखी काही अनुभव आजच्या उत्तरार्धात...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language